डॉ. शितल आमटेंचा मोबाइल, लॅपटॉप अन् टॅब उघडण्यात अपयश, तपास करणार्‍यांकडून ‘कसरत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितल आमटे यांची आत्महत्या की अपघाती मृत्यू याबाबत साडेतीन महिने उलटले तरी स्पष्टता नाही. एक हायप्रोफाइल केस असतानाही पोलिसांना तपासास बराच वेळ लागला आहे. दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले
लॅपटॉप, मोबाइल व टॅब उघडण्यात मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला अपयश आल्याचे समोर आले आहे. आता हे सर्व साहित्य पुण्याच्या न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

३० नोव्हेंबर रोजी डॉ. शितल आमटे यांनी स्वत:च्या खोलीत इंजेक्शन घेवून आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या की अपघाती मृत्यू हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. शितल यांचा मृत्यू श्वसननलिका बंद पडल्याने झाल्याचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले होते. तसेच त्यांचा लॅपटॉप, मोबाइल व टॅब जप्त केला होता. मात्र त्याला पासवर्ड शीतल यांचे डोळे असल्याने मोबाईल, लॅपटॉप व टॅब मुंबई येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचीही माहिती तेव्हा दिली होती. मात्र या ठिकाणीही मोबाईल, लॅपटॉप व टॅबचे लॉक उघडण्यात अपयश आले आहे. शेवटी पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत हे सर्व साहित्य पाठविण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

१५ दिवसांचा कालावधी उलटला तरी पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेलाही लॅपटॉप, मोबाईल व टॅब उघडण्यात अपयश आले आहे. विशेष म्हणजे संबंधित मोबाइल कंपनी, लॅपटॉप कंपनीचे अभियंतेही लॉक उघडू शकले नसल्याची माहितीही समोर येऊ लागली आहे. तपासात निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरे मिळने आवश्यक आहे. लॅपटॉप, मोबाईल उघडले तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असेही पोलीस अधिक्षक साळवे म्हणाले.