डॉ. शीतल आमटे मृत्यू प्रकरण : पोलिसांचा घातपाताच्या दिशेने तपास सुरु, आनंदवनातील 16 जणांचे जबाब नोंदविले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी डॉ. बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. शीतल आमटे- करजगी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस घातपाताच्या दिशेने तपास करत आहेत. यासंदर्भात आनंदवनातील जवळपास 16 लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

डॉ. शीतल यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी पोलिसांनी या प्रकरणी तपासाला वेगळे वळण दिले आहे. डॉ. शीतल यांचा घातपात तर झाला नसावा, ही बाबही पोलीस पडताळून पाहत आहेत. आत्महत्येपूर्वी शीतल यांना कोण भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आनंदवनातील 16 जणांचे जबाब नोंदविले. दरम्यान, डॉ. शीतल या मानसिक तणावात होत्या, ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. या मानसिक तणावाचे कारण काय होते, या दिशेनेही तपास सुरू आहे.

फाॅरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा
डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर काही गोष्टीसाठी व अवयव तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे कोणत्या दिशेने फिरतील हे समजू शकेल. तर डॉ. शीतल यांच्या मृत्युनंतर पोलिसांनी त्यांचे दोन मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब जप्त केले. मात्र डॉ. शीतल यांनी हे उघडण्यासाठी आपले डोळेच पासवर्ड ठेवल्याने पोलीस हतबल झाले. त्यांचा पासवर्ड तोडून काढणे येथील सायबर सेललाही शक्य न झाल्यामुळे त्यांचे मोबाईल, लॅपटॉप मुंबई सायबर सेलकडे पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. तो आल्यावर इतर बाबींचा खुलासा होणार आहे.