डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांनी जाहीर केली भूमिका, आता संपत्तीच्या वादावर पडदा

लातूर : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर संजीवन समाधी घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. या चर्चेमुळे अहमदपूर भक्तिस्थळ भागात हजारो लोकांची गर्दी झालेली होती. मात्र, ही अफवा असल्याचे समोर आले. परंतु, त्यानंतर अहमदपूर मठाच्या 50 कोटी रूपयाच्या संपत्तीचा तो वाद होता, अशीही चर्चे समोर आली. त्यावरून विद्यमान ट्रस्टी आणि शिवा संघटनेत आरोपप्रत्यारोप होत राहिले. अखेर या वादावर पडदा पडला आहे.

नांदेड येथे उपचार घेणारे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या भेटीसाठी शासकीय पथक गेलेले होते. यामध्ये लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर, नांदेडचे पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. ही संपूर्ण चर्चा इन कॅमेरा घेण्यात आली आहे. चर्चे दरम्यान, महाराजांनी सांगितले की, विद्यमान नूतन ट्रस्टी हे मी स्वत: नेमले आहेत. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. अहमदपूर आणि हाडोळती येथील मठावर परवाच नेमलेले उत्तराधिकारी असतील. मुख्य बाब म्हणजे मठाच्या आणि ट्रस्टच्या बाबतीत कोणत्याही पक्ष आणि संघटनेच्या हस्तक्षेप नको आहे. माझ्या समाधीची खोटी माहिती कोणी दिली आहे? मला माहित नाही त्याचा योग्य तो तपासा करावा.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहे. महाराजांची प्रकृती खालावली असली तरी सध्या ते उपचारांना साथ देत आहेत. अफवा पसरवणारे कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती शासकीय पथकातील लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.