पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Dr. Vijay Ramanan | शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा ‘कॉमन व्हेरीएबल इम्यून डिफिशियन्सी’ (सीव्हीआयडी) आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून आपल्याच लाल रक्तपेशींवर हल्ला करणारा ‘ऑटोइम्यून हेमोलिटिक अॅनिमिया’ (एआयएचए) या दुर्मिळ आजारांनी त्रस्त असलेल्या २० वर्षीय तरुणावर पुण्यातील रक्तविकारतज्ज्ञांनी रुग्णाच्या स्वतःच्या पेशी वापरून ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ करून त्याला नवजीवन दिले. हे उपचार पुण्याच्या यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिक व रुबी हॉल येथे करण्यात आले.
पुण्यातील वाघोली येथे राहणारा सुमित (नाव बदललेले) हा २०२० मध्ये १६ वर्षाचा असताना त्याचे दर सहा ते सात महिन्यांनी हिमोग्लोबिन कमी व्हायचे. अनेक उपचार करूनही त्याला फरक पडला नाही. तो रक्तविकारतज्ञ (हेमॅटोलॉजिस्ट) डॉ. विजय रमणन यांच्याकडे आला. डॉ. रमणन यांनी त्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक इंजेक्शन दिले. मात्र चार महिन्यांनंतर सुमित पुन्हा त्याच तक्रारींसह परत आला. यावेळी त्याचे फक्त हिमोग्लोबिनच नव्हे, तर रक्ताच्या गाठी तयार करणाऱ्या प्लेटलेटची संख्याही कमी झाली होती. त्याचबरोबर त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही ६०० पर्यंत गेले होते. ज्यामुळे त्याला टाईप १ डायबेटीसचे निदान झाले. पुढील तपासणीत त्याला ‘सीव्हीआयडी’ असल्याचे समोर आले, जो एक अनुवंशिक रोग आहे.
डॉ. रमणन यांनी त्याची साखर नियंत्रणात आणण्यासाठी इन्शुलिन उपचार सुरू केले आणि ‘सीव्हीआयडी’ व ए’आयएचए’ साठी ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ केले. या प्रक्रियेत रुग्णाच्या अस्थिमज्जेमधून पेशी (स्टेम सेल्स) घेऊन रुग्णांवर प्रत्यारोपित केल्या जातात. यानंतर रुग्णाची प्लेटलेट संख्या सामान्य झाली, टाईप १ डायबेटीस देखील नाहीस झाला आणि हिमोग्लोबिन पातळीही वाढली. हिमोग्लोबिन पातळी पूर्ववत न झाल्याने त्याला अतिरिक्त इंजेक्शन उपचार सुरू करण्यात आले. दर चार-पाच महिन्यांनी नियमित फॉलोअप घेतल्यानंतर आता रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. आता तो अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन शिक्षणही घेत आहे, अशी माहिती यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिकचे रक्तविकारतज्ञ डॉ. विजय रमणन यांनी दिली.
कॉमन व्हेरीएबल इम्यून डिफिशियन्सी हा मुलांमध्ये आढळणारा एक अनुवंशिक विकार आहे. याच्या निदानासाठी ‘नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एन एस जी) चाचणी करावी लागते. टाईप १ डायबेटीसच्या रुग्णांमध्ये निदानानंतर एका वर्षाच्या आत ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट केल्यास हे एक प्रभावी ठरू शकते. संधिवात किंवा प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या क्लॅरॉसिस या आजारातही ऑटोलोगस ट्रान्सप्लांट प्रभावी ठरू शकते.
- डॉ. विजय रमणन, रक्तविकारतज्ञ, यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिक