लाल किल्ल्यावर PM मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात होती ‘स्वदेशी’ अ‍ॅन्टी ड्रोन सिस्टीम, 2.5 KM पर्यंत लावू शकतो ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशाच्या 74 व्या स्वातंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्याजवळ संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (DRDO) विकसित करण्यात आलेल्या ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा बसविण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोजक्या निमंत्रित पाहुण्यांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून ही यंत्रणा उभारण्यात आली होती. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पने अंतर्गत डीआरडीओमार्फत नवनवीन यंत्रणा आणि तंत्रज्ञान निर्मिती सातत्याने करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण खबरदारी घेत हा कार्यक्रम पार पडला.

लाल किल्ल्यावर पोलीस, एनएसजी कमांडो, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (आयटीबीपी), स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. तसेच विविध ठिकाणी 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. यंदा लाल किल्ल्यावर 4 हजार सुरक्षारक्षांचा खडा पहारा होता, अशी माहिती मिळाली आहे.

या सुरक्षा रक्षकांसोबत तैनात केलेली अँटी ड्रोन सिस्टीम ही तितकीच विशेष आहे. या यंत्रणेचे वैशिष्ट्य म्हणजे ही सुमारे तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरात आलेल्या मायक्रो ड्रोनला शोधण्यास मदत करते. तसेच हे मायक्रो डोन जॅम करते. तसेच ही सिस्टिम अडीच किलोमीटर पर्यंतच्या परिघातील लक्ष लेझर किरणांद्वारे पाडण्यास सक्षम असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. ही अँटी ड्रोन यंत्रणा देशातील पश्चिम आणि उत्तर क्षेत्रात वाढत असलेल्या ड्रोन आधारित क्रियांना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरेल, अशीही माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.