12 वर्षांपासून गंगा ‘मृतदेह’मुक्त करण्याचे पाहिलेले स्वप्न आता झाले ‘पूर्ण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बरोबर 12 वर्षांपूर्वी हरिद्वार कुंभमेळ्यात अखिल भारतीय अखाडा परिषदेने गंगेत मृत साधूंची जलसमाधी थांबवण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला होता. गंगा वाचवण्याचे संतांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. हरिद्वार कुंभमेळ्यात घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम अन्य तीन कुंभ नगर प्रयाग, उज्जैन आणि नाशिकवरही पडणार आहे. गंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या मार्गातील हे सर्वात मोठे पाऊल असणार आहे.

2010 मध्ये हरिद्वार कुंभमेळ्याच्या एक वर्ष आधी जेव्हा कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आखाडा परिषदेची बैठक सुरू होती, तेव्हा अध्यक्ष श्रीमंहत ज्ञानदास आणि महामंत्री श्रीमहंत हरी गिरी यांनी संयुक्तपणे भू-समाधीबाबतचा प्रस्ताव ठेवला. साधूंचे म्हणणे होते की, आम्हाला गंगा प्रदुषणमुक्त करण्याच्या कार्यात योगदान द्यायचे आहे.

संन्याशांच्या जूना, अग्नि, आह्वान, आनंद, अटल, महानिर्वाण आणि निरंजनी या सातही अखाड्यांमध्ये मृत साधूंना गंगेच्या पाण्यात समाधी देण्याची परंपरा आहे. दरवर्षी हरिद्वारमध्ये संन्याशांपैकी जेवढ्या साधूंचे ब्रह्मलीन म्हणजे निधन होते, त्यांचे मृतदेह गंगेत सोडले जातात.

तत्कालीन निशंक सरकारने दर्शवली सहमती
गंगा मृतदेहमुक्त करण्याच्या आखाडा परिषदेच्या या प्रस्तावाला तत्कालीन निशंक सरकारने सुद्धा सहमती दर्शवली होती, परंतु जागेची निवड होऊ शकली नाही. नंतर ही मागणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रयाग, नाशिक आणि उज्जैन कुंभ नगरांसाठी करण्यात आली.

आता पुढील वर्षी होणार्‍या कुंभमेळ्यापूर्वी अखाड़ा परिषदेने भू – समाधीसाठा जागा मिळवण्याचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तीनवेळा विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हा आणि मेळा प्रशासन सक्रिय झाले आहे.

श्रीमहंत हरी गिरी यांनी सांगितले की, हरिद्वारमध्ये जमीन मिळताच जलसमाधी बंद करण्यात येईल. गंगा, यमुना, शिप्रा आणि गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी आखाडा परिषद पूर्ण सहकार्य करणार आहे.