डीआरआयची पुण्यात मोठी कारवाई, तब्बल ८३५ किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डीआरआय (डिरेक्टर ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या पुणे विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका ट्रकमधून नेले जात असलेले तब्बल ८३५.४८ किलो वजनाचा १ कोटी २५ लाख रुपये किंमतीचा गांजा पथकाने जप्त केला आहे. मंचर निरगूडसर रस्त्यावर डिआरआयच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

अमित ज्ञानेश्वर बीडकर, गुंडू राव पाटील, दीपक, इलायाबकास बाबामियां मुंडे, नसीर गफूर पठाण अशा पाच जणांना डीआरआयच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

डिआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिआरआयच्या पुणे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मंचर निरगुडसर रस्त्यावर पिंपळेगाव खडकी येथे एका ट्रकला पकडले. या ट्रक (MH 12 QF 4567) व त्याच्या समोर एक इनोव्हा कार जात होते. त्यावेळी त्या दोन्ही गाड्यांमध्ये पाच जण होते. त्यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

त्यानंतर ट्रकचीही पाहणी केली. तेव्हा ट्रकमध्ये एक खोटा कप्पा तयार करण्यात आला होता. त्यात बोल्टने व्यवस्थित बंद करण्यात आले होते. त्यानंतर एका लोखंडी शीटला हटविल्यानंतर त्याखाली असलेल्या या कप्प्यात अधिकाऱ्यांना काही चौकोनी पॅकेट्स दिसून आली. त्या पॅकेट्स मध्ये पाहिल्यावर त्यात गांजा सदृश्य पानं दिसल. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ट्रकमधून अशा प्रकारचे १४९ पॅकेट्स काढून ते जप्त केले आहेत. या गांजाचं वजन तब्बल ८३५. ४७ किलो ग्राम आहे. हा गांजा जप्त करण्यात आला तर त्यासोबतच तो वाहून नेणारा ट्रक व इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी २५ लाख ३२ हजार, २०० रुपये आहे.