बियर प्या, गायीला आसरा द्या…

नॉयडा :वृत्तसंस्था – नॉयडामध्ये असाल आणि बियरचे शौकीन असाल तर तुम्हाला सरकारला विशेष कर द्यावा लागणार आहे. बियर किंवा परदेशी मद्याच्या विक्रीतून सरकार गायींसाठी तात्पूरता निवारा केंद्र सुरु करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळाने याबाबतचा ठराव नुकताच संमत केला आहे.

बियरच्या प्रत्येक बाटलीमागे पाच तर मद्याच्या प्रत्येक बाटलीमागे १० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. कमी प्रतिच्या बियर-मद्याच्या बाटल्यांवर ०.३० टक्के कर लावला जाणार आहे. हा इतर करांपेक्षा वेगळा कर म्हणून गोळा केला जाणार आहे. थोडक्यात कंपन्यांना या करापोटी प्रत्येक बाटलीमागे एक ते तीन रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. म्हणजेच सरकारला प्रत्येक मद्याच्या बाटलीतून १३ रुपये मिळणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, उत्पादन शुल्कापोटी सरकारला मिळणाऱ्या रकमेत आणखी १६५ कोटींची भर पडणार आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या भाकड गायींचा नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांच्यासाठी तात्पूरता निवारा बांधण्याचे नुकतेच सरकारने ठरवले.

त्यानुसार ही कर आकारणी केली जाणार आहे. या निवारा केंद्रांचा रखरखाव आणि तिथल्या सुविधांचे ओझे सरकारने उत्पादन शुल्क विभागाच्या गळ्यात बांधले आहे. उत्पादन शुल्क मंत्री जय प्रताप सिंह यांनी सुरूवातीला अशापध्दतीने कर आकारणीस विरोध दर्शवला होता.