कर्ज वसुलीसाठी चालकासह कंटेनर पळवला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्ज वसुली झाली नाही तर फायनान्स कंपनी तारण ठेवलेल्या वस्तू जप्त करतात. मात्र एका  फायनान्स कंपनीच्या हप्ता वसुली करणाऱ्या मंडळींनी कंटेनरसह त्याच्या चालकासहीत पळवण्याचा प्रकार समोर आला आहे. सूरज शर्मा असे पळवण्यात आलेल्या चालकाचे नाव असून तो मूळचा हरियाणाचा आहे. पळवणाऱ्यांच्या तावडीतून सुटून चालकाने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आहे. सदर घटना ठाणे येथे घडली.

चालक सूरज शर्मा  पनवेलमध्ये साहित्य पोहचविण्यासाठी आला होता. त्यानंतर भिवंडीत साहित्य भरून उत्तरप्रदेशकडे जात असताना कोपरी रेल्वे पुलादरम्यान त्याला दोन दुचाकीस्वारांनी आणि गाडीमधून आलेल्यांनी पकडले. त्यानंतर त्याला गाडीमध्ये घालून एका यार्डामध्ये नेण्यात आले. त्याच्या ताब्यातील कंटेनर, त्यातील साहित्य आणि ३० हजार रुपये या मंडळींनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांचा डोळा चुकवून हा चालक तेथून बाहेर पडला आणि त्याने मालक तसेच पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.