राजापूर : स्वत:ला वाचवण्यासाठी गाडीतून मारली उडी पण तरीही झाला मृत्यूच

राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे कुंभारवाडाजवळ एक अपघात झाला. मातीच्या भरावावर चढून टेम्पो पलटी झाला होता. याच टेम्पोतून स्वत:ला वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर उडी मारणाऱ्या चालकाचा टेम्पोखाली चिरडून दुर्दैवाने मृत्यू झाला. गोवा वेर्णे येथून केबल भरून हा टेम्पो उत्तर प्रदेशकडे जात होता. त्यादरम्यान ही घटना घडली.

दिलीपकुमार नरेश सिंह (23, शेहचंदपूर, उत्तर प्रदेश) असे या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. दिलीपकुमार आणि क्लिनर अनुजसिंह हे दोघेजण टेम्पोत होते. गोवा वेर्णे येथून केबल भरून हा टेम्पो उत्तर प्रदेशकडे जात होता. त्यादरम्यान हा अपघात झाला. राजापूर तालुक्यातील उन्हाळेनजीक हा टेम्पो सकाळी आला असताना समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाला बाजू देताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि हा टेम्पो रस्त्याजवळ असलेल्या मातीच्या भरावारवर चढला. त्यादरम्यान, दिलीपकुमार याने टेम्पोबाहेर उडी घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर चालकाचा मृतदेह राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली.