मालकाच्या त्रासाला कंटाळून चालकाची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मालकाच्या त्रासास कंटाळून वाहनचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. पारनेर तालुक्यातील दैठणेगुंजाळ येथे ही घटना घडली.
याप्रकरणी पोपट रखमाजी होळकर (रा.नेप्ती, ता. नगर) याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दादासाहेब भाऊसाहेब गुंजाळ (वय 30,  रा. दैठणेगुंजाळ, ता. पारनेर) हे मयताचे नाव आहे.
याप्रकरणी मयताची पत्नी संगीता गुंजाळ यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दादासाहेब गुंजाळ हे पोपट होळकर याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होते. ते कामावर न गेल्याने 19 डिसेंबर रोजी तो गुंजाळ यांच्या घरी आला. कामावर का आला नाही, याबाबत अशी विचारणा होळकर हा गुंजाळ यांना करू लागला. त्यावर गुंजाळ यांनी मी तुमच्या कामावर येणार नाही. दुसरा चालक पाहा, असे सांगितले. त्यामुळे रागवलेल्या पोपट होळकर याने हातपाय तोडण्याची धमकी देऊन कामावर घेऊन गेला.
कामावरून परत आल्यानंतर दादासाहेब गुंजाळ यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी तातडीने तारकपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 26 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी संगीता गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून पोपट होळकर यांच्या वृद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार हे करीत आहेत.