लातुरात तरुणाचा झिंग झिंग झिंगाट, कार पलटी झाली तरी झिंग उतरेना 

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘Drunk & Drive’ चा कायदा कडक केला असला तरी अजूनही मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या महाभागांची संख्या कमी नाही. लातूर मध्ये अशीच एक घटना घडली आहे ज्यात एकाने मद्यधुंद होऊन गाडी चालवली  एवढेच नाही तर त्याची कार डिव्हायडर वर आदळली. ही कार अक्षरशः पलटी खाऊन उलटली होती. असे असताना आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणाला अपघातातून वाचवले. पण चक्क शिव्या देऊन या नागरिकांची या तरुणाने परतफेड केली. दैवीक दिवाकर शेट्टी असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मद्यधुंद होऊन ‘झिंगाट’ झालेल्या तरुणाची चार चाकी शहरातील औसा रस्त्यावरील आर. जे. कॉम्प्लेक्स जवळ मध्यरात्री उलटली. डिव्हायडर आदळलेली ही कार अक्षरशः पलटी खाऊन उलटली होती. ज्यामध्ये अडकलेला मद्यधुंद वाहनचालक दैवीक दिवाकर शेट्टी आणि त्याची मैत्रीण दोघे जखमी झाले. यावेळी अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढलेल्या नागरिकांना ‘झिंगाट’ झालेल्या तरुणाने  शिव्यांची लाखोळी वाहत केलेल्या मदतीची अजब तऱ्हेने परतफेड केली. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पिता दिवाकर शेट्टी घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही ‘शेट्टी’ पुत्राची नशा उतरलेली नव्हती हे विशेष होते.

दरम्यान, मद्यधुंद होऊन बेफाम गाडी चालविणाऱ्या या शेट्टी पुत्रावर लातूर पोलिस काय कारवाई करणार ? मद्यधुंद होऊन गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून ‘Drunk & Drive’ वर अंकुश आणणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस अधिक कारवाई करीत आहेत.