दुष्काळाची दाहकता : पाण्याने घेतला मुलाचा बळी

नाशिक : वृत्तसंस्था – दुष्काळाची दाहकता तीव्र होत असून सर्वांना पावसाची प्रतीक्षा असली तरी पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झालेल्या नागरिकांवर दाहीदिशा भटकण्याची वेळ ओढवली आहे. एक हंडाभर पाणी विहिरीतून घेतल्याने बीडमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असताना एका ११ वर्षीय मुलाने पाण्यासाठी जीव गमावल्याची दुर्दैवी घटना सटाणा तालुक्यात घडली आहे.

वटार येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मामाच्या शेतातून पिण्याचे पाणी आणताना एका ११ वर्षीय मुलाचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला. अक्षय नंदू गांगुर्डे, असे मृत मुलाचे नाव आहे. सटाणा तालुक्यातील विरगाव येथे शिकणाऱ्या या अकरा वर्षांच्या अक्षय गांगुर्डेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिसरात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे. पाणी आणताना मुलाचा झालेला मृत्यू, ही तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी ठरली आहे. अक्षय नंदू गांगुर्डे सकाळी सात वाजताच्या सुमारास वडिलांसोबत वटार येथे मामाच्या मळ्यात टँकर भरण्यासाठी गेला होता. यावेळी परत येताना अक्षयचा तोल गेला आणि त्याचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला.