८५ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके, सर्वाधिक झळ मराठवाड्याला

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – राज्यातील ८५ लाखांहून अधिक शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडले असून त्यांना चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. या दुष्काळाची सर्वाधिक झळ मराठवाड्याला बसणार आहे. कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात ही गंभीर बाब नमूद केली आहे. दुष्काळाचा आपत्ती निवारण कायद्यात समावेश करावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसानीचा आकडा साडेसात हजार कोटींच्या पुढे जाण्याची भीती असून, याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसणार आहे. खरीप हंगामात शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातही अपरिमित हानी झाली. सरासरी क्षेत्राच्या जेमतेम १३ टक्केच पेरण्या झाल्या असून, जमिनीत ओलच नसल्यामुळे झालेला पेराही तापणाऱ्या उन्हाने सुकून गेल्याचे चित्र आहे. उगवून आलेल्या पिकांनी माना टाकल्या. तूृर, सोयाबीनच्या शेंगा परिपक्व झाल्याच नाहीत. कापूस पिकाची अवस्था कुपोषित बाळासारखी झाली. कापसाची बोंडे पोसलीच नाही. हलक्या जमिनीतील फूल, कळ्या, पाते गळून पडले. वाढीच्या अवस्थेतल्या इतर पिकांची अशीच दुरवस्था झाली. परिणामी उत्पादकतेत मोठी घट झाली. काही ठिकाणी तर उत्पादन निरंक अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा कशा जगवाव्यात, या चिंतेत शेतकरी आहेत.

राज्यात पीकविम्याचा ४ हजार कोटींचा घोटाळा : विखे पाटील 

मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळता इतर तालुक्यांतही मोठे नुकसान झाले आहे. राज्यातल्या ३ लाख ९२ हजार हेक्टर फळबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. हे नुकसान १८३ कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे.