‘विकत घ्या, विकत घ्या, आमचे गाव विकत घ्या’ ! दुष्काळामुळे ‘त्यांनी’ काढले ‘गाव’ विकायला

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ, त्यामुळे रानात काही पिकले नाही़. राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्यांनाच लाभ मिळाला. पिकविमाचे पैसे मिळाले नाहीत. बँका आता खरीप पिकासाठी कर्ज देण्यास दारात उभे करीत नाही. अशी सर्व परिस्थिती असल्याने सेनगाव तालुक्यातील ताकतोडावासियांनी गाव विकायला काढले आहे.

सरकारने गाव विकत घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी गावकरी आजपासून बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून मुलांना शाळेत न पाठविता मंदिरातच शाळा भरविण्यात येणार आहे. त्यांना गावातील बेरोजगार तरुण शिकविणार आहेत.

साडेतीन हजार लोकसंख्येचे सधन गाव ताकतोडा मागील काही वर्षांपासून सततच्या दुष्काळाने आर्थिक कोंडीत सापडले. कर्जमाफी झाली मात्र बँक त्याची माहिती देत नाही. जे शेतकरी दीड लाखाच्या आतले आहेत त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्यांनाच त्याची माहिती मिळाली. त्यांनाही काहीतरी रक्कम भरावी लागली तेव्हा कुठे खाते बेबाक झाले. त्यानंतर नवीन कर्ज बँकेने नाकारले. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना तर आता कुठे माहिती दिली जात आहे.

ताकतोडा गावातील ३६७ पैकी २८६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असले तरी दीड लाखाच्या आत कर्ज असलेल्या १८५ शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा झाला. ही माहितीदेखील या शेतकऱ्यांना दिली गेली नव्हती. गाव विकण्याचा निर्णय घेतलेल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडून आता या शेतकऱ्यांना ही माहिती दिली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –