दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश ‘गायब’, NCB च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन- सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग्स प्रकरणाचा तपास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (ncb) करत आहे. या प्रकरणाचा तपास करताना एनसीबीला अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika-padukone) आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यातील काही संदिग्ध चॅट सापडले होते. त्यानंतर दीपिका आणि करिश्माची चौकशी केली होती. नुकताच एनसीबी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. पण आता अधिकाऱ्यांनी म्हटल आहे, की करिश्मा कुठे आहे (karishma-prakash-untraceable-says-ncb-official) याचा काहीच पत्ता नाही.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की हे खरे आहे की,करिश्मासोबत काहीच संपर्क होऊ शकत नाही आणि ती समन्स पाठवल्यावरही चौकशीसाठी हजर राहिली नाही. करिश्माला 27 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता. दरम्यान एनसीबीला तपासादरम्यान करिश्माच्या घरी 1.7 ग्रॅम चरस आणि सीबीडी ऑइलच्या काही बॉटल सापडल्या होत्या.

याआधी करिश्माने शनिवारी जामीनासाठी मुंबईच्या विशेष कोर्टात अर्ज केला होता. ड्रग चॅट प्रकरणात एनसीबीने दीपिका पदुकोणसोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंहची चौकशी केली होती. पण त्यानंतर पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवले नाही. काही दिवसांपूर्वी एनसीबीने हेही स्पष्ट केलं होतं, की त्यांनी कुणालाही क्लीन चीट दिलेली नाही.