येरवड्यात बनावट पदवीच्या आधारे नशा मुक्ती केंद्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा येथे स्वत:च्या नावासमोर एमबीबीएसची पदवी लावून नशा मुक्ती केंद्राची जस्ट डायलवर जाहिरात करणाऱ्या बोगस डॉक्टरविरोधात येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गालीब गुलाब शेख (रा. भाजी मार्केट समोर नशा मुक्ती केंद्र) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी तिरुपती शंकरराव पांचाळ (३१, कमला नेहरू हॉस्पीटल मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ हे पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत. तर गालीब शेख याने येरवडा भाजी मार्केट परिसरात आपले नशा मुक्ती केंद्र थाटले. त्याने जस्ट डायलवर जाहिरातही केली. त्यात आपल्या फोटोसमोर त्याने एमबीबीएस पदवी नसतानाही ती लावली. तसेच आपल्या केंद्रातही पदवी लावून त्याने व्यवसाय थाटला. याप्रकरणी पांचाळ यांच्याकडे तक्रार आली होती. त्याच्याकडे पदवीबाबात चौकशी केल्यावर एमबीबीएसची कोणतीही कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. त्याची पदवी बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे करत आहेत.