पुण्यात अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 6 परदेशी नागरिकांना अटक, 68 लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे शहरात होत असलेल्या अमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा परदेशी नागरिकांना अटक केली असून, यामध्ये महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले लोक टांझानिया आणि युगांडा येथील असून, त्यांच्याकडून 57 लाखांच्या अमली पदार्थासह 68 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालू वर्षामध्ये पुणे पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनफ्रेड दाऊद मंड (वय 30), महिला अनास्टाझिया डेव्हिड (वय 26), हसन अली कासीद (वय 32), बेका हमीस फॉऊमी (वय 42, चौघे रा. टांझानिया), शामिम नंदावुला (वय 30), पर्सी नाईगा (वय 25, दोघे रा. युगांडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी उंड्री परिसरातील अतुर हिल्स सोसायटीमध्ये रो हाउसमध्ये राहत होते. ही कारवाई बुधवारी (दि.10) करण्यात आली.

अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक मनोज साळुंके यांना पाच ते सहा परदेशी इसम व महिला अमली पदार्थाची तस्करी करत असून, हे सर्वजण उंड्री येथील अतुर हिल्स सोसायटीमध्ये एका रो हाउसमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने रो हाउस नं.2 मध्ये छापा टाकला. घराची झडती घेतली असता, घरातून 186 ग्रॅम 800 मिलिग्रॅम कोकेन अंदाजे किंमत 9 लाख 57 हजार 600 व 1 किलो 151 ग्रॅम मफेड्रॉन (एमडी) अंदाजे किंमत 57 लाख 55 हजार, रोख रुपये 54 हजार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा, प्लास्टिक पिशव्या व बॉटल्स अंदाजे किंमत 1 लाख 19 हजार 500 मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी 68 लाख 86 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रवीण शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, पांडुरंग पवार, रुबी अब्राहम, मनोज साळुंके, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केली. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.