पुण्यात लॉकडाऊन मध्ये सुद्धा नामांकित महाविद्यालयाच्या गेटवर अमली पदार्थांची विक्री

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात लॉकडाऊन काळात देखील अमली पदार्थांची तस्करी सुरू असून, विमानतळ भागातील एका नामांकित महाविद्यालयाच्या गेटवर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत मॅफेड्रोन हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून सव्वा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अमजद मगबुल खान (वय 44, रा. भवानी पेठ) आणि तेजेंदरपाल परमजितसिंग बग्गा (वय 21, रा. गणपती चौक, विमाननगर) या दोघांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन आहे. सर्व आस्थापना बंद होत्या. तर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ देखील विक्री करण्यास बंदी होती. पान स्टॉल अद्याप देखील बंदच ठेवण्याच्या सूचना आहेत. पंरतु या काळात गुटखा आणि सिगारेटची चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे दिसून आले होते. याबाबत पुणे पोलिसांनी कारवाया देखील मोठ्या प्रमाणात केल्या आहेत.

मात्र पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित महाविद्यालयाच्या गेट न.2 समोर दोघांना मॅफेड्रोन हा अमली पदार्थ विक्री करताना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून 12 ग्रॅम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. मॅफेड्रोन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अमली विरोधी पदार्थ पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड, प्रसाद मोकाशी, कर्मचारी उदय काळभोर, संदीप साबळे, अमोल पिलाने, पांडुरंग वांजळे, हनुमंत गायकवाड, फिरोज बागवान, मोहन एलपले आणि सुनील चिकले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.