मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक

मुंबई : कमिशनच्या हव्यासापोटी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) यश आले आहे. दीबा ओलिवर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उच्चशिक्षित तरुणही मादक पदार्थांच्या विक्री व तस्करीत गुंतल्याची बाब समोर आली आहे. एनसीबीने अमली पदार्थ जप्त केले आहे.

ओलिवर हा दुबईतील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. वैद्यकीय उपचारासाठीचा व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याला क्षयरोगाचा त्रास असल्याने त्याच्या उपचारासाठी तो मुंबईत आला. यावेळी त्याला पैशाची चणचण भासू लागली. दरम्यान तो ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आला. त्याला चांगले कमिशन मिळू लागल्याने त्याने विक्री सुरू केली. ही माहिती एनसीबीला समजताच पथकाने बुधवारी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान तो कमिशनच्या हव्यासापोटी काही महिन्यांपासून ड्रग्ज पेडलर म्हणून काम करीत होता अशी माहिती प्राथमिक तपासात आली आहे.

ओलिवरला जर एखादी ऑर्डर मिळाळती तर तो त्याच्या माणसाकडून घेऊन ऑटो किंवा टॅक्सीच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी करायचा. एनसीबीने दीबा याच्यासह आणखी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे. मोहम्मद इमरान अन्सारी असे त्याचे नाव असून एनसीबीने त्याच्या घरी छापा मारला त्यावेळी त्याने ड्रग्ज खिडकीतून खाली फेकून दिले. यावेळी त्याच्या घरातून साडेनऊ लाख रुपये जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.