कृत्रिम पायातून ड्रग्जची तस्करी, पोलिसांनी ‘सलमान’ला ठोकल्या बेड्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी ड्रग्जच्या कॅप्सूलची तस्करी करण्याचा प्रकार यापूर्वी अनेकवेळा घडला आहे. मात्र नागपूर पोलिसांनी अटक केलल्या आरोपीने आपल्या अपंगत्त्वाचा आधार घेऊन कोट्यावधींच्या अंमली पदार्थांची वाहतूक केल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीला मंगळवारी (दि.18) नाटयमयरित्या अटक केली. सलमान खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपीकडून 13 लाख रुपये किमतीचे एमडी आणि 7 लाख 80 हजार रुपयांचे चरस जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सलमानने यापूर्वी चार वेळा अशा प्रकारे आपल्या कृत्रिम पायातून ड्रग्जची तस्करी केली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलमानला अटक करुन ड्रग्ज जप्त केले आहे.

अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात दोन दिवसांपासून नागपूर गुन्हे शाखेने धडक मोहिम उघडली आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांनी तब्बल 86 ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली आहे. नागपूर शहरात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतर्गत 13 कारवाया करत पोलिसांनी ड्रग्ज, एमडी, चरस यासारख्या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या 20 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी लॉकडाऊन काळात ट्रकचे टायर, ट्यूब आणि लहान पार्सलमधूनही अंमली पदार्थांची तस्कीर शोधून काढली आहे. परंतु यावेळी त्यांनी एका कृत्रिम पायातून ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. त्यावेळी सलमान खान नावाचा ड्रग्ज तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची झडती घेतली असता त्याचा डावा पाय कृत्रिम असल्याचे दिसले. त्याची झडती घेतल्यानंतर त्यात एमडी नावाचा अंमली पदार्थ सापडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सलमान खान याची चौकशी केली असता त्याने याआधी चार वेळा मुंबई येथून अशाच प्रकारे ड्रग्जची तस्करी केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो ड्रग्ज कृत्रिम पायात लपवून वेगवेगळ्या मार्गाने नागपूरमध्ये घेऊन येत होता. अशाच प्रकारे तो इंदौर मार्गे तर कधी भुसावळ मार्गे नागपूरमध्ये ड्रग्ज घेऊन येत होता, असंही पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आलं आहे.