धक्कादायक ! सेवानिवृत्त कर्नलला पत्नीने बेशुध्द करून घरात डांबले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या ६२ वर्षीय कर्नलला त्याच्याच ५८ वर्षीय पत्नीने पाण्यातून गूंगीचे औषध देऊन बेशुध्द करत घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नलच्या वृध्द पित्याने त्यांचा फोन करून मुलाचा फोन लागत नसल्याचे सांगितल्यावर विमानतळ पोलिसांनी घरी जाऊन त्यांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांचा जबाब घेतला असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. परंतु यासंदर्भातील वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात पुढील करावाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

राजीव बक्षी हे लष्करातून कर्नल पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर रितू बक्षी असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. मी त्यादिवशी घरी आलो. तेव्हा माझ्या पत्नीने मला पाणी पिण्यासाठी दिले. पाणी पिल्यानंतर मला भोवळ आली. त्यानंतर मी खुपच अशक्त स्थितीत गेलो आणि बेसुद्ध झालो. मी तेथून पळण्याचाही प्रयत्न केला. परंतु दाराला लॉक करण्यात आले होते. असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पत्नीच्या पोलिसांकडे तक्रारी
राजीव बक्षी यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मार्च महिन्यात राजीव दिल्लीला गेले होते. त्यांची आई आजारी असल्याने ते दिल्लीत गेले होते. त्यावेळी रितू यांनी तेथेही गोंधळ घातला होता. त्यानंतर पुण्यात परतल्यावर त्यांनी आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार विमानतळ पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी राजीव यांचा शोध घेतला तेव्हा ते बेपत्ता नसल्याचे समोर आले. त्यानंतर काही आठवड्यांनंतर रितू यांनी थेट पोलीस आयुक्तांची व सहायक पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन पतीविरोधात तक्रार केली होती.

या प्रकारानंतर विमानतळ पोलिसांनी राजीव बक्षी यांना दिल्लीहून बोलवले. परंतु ते रुग्णालयात आपल्या आईसोबत असल्याचे लाईव्ह लोकेशन त्यांनी पोलिसांना पाठवले. परंतु तरीही रितू या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. पोलिसांनी राजीव यांना पुण्यात येण्याची विनंती केली. तेव्हा ते ३ एप्रिलला पुण्यात आले. काही दिवस ते आपल्या मित्राच्या घऱी राहात होते. त्यांनी पोलिसांची भेट झाल्यावर हकिकत सांगितली. लग्न झाल्यापासून मागील ३० वर्षात मी माझ्या नातेवाईकांना भेटलेले किंवा त्यांच्या संपर्कात राहणे माझ्या पत्नीला आवडत नव्हते. गेली २० वर्षे ते आपल्या आईवडीलांनाही भेटले नाहीत. माझे वडील आता ९५ तर आई ८५ वर्षांची आहे. परंतु आई आजारी असल्याने मी लगेच दिल्लीला गेलो. मला माझी पत्नी खरेदीसाठी बाहेर गेल्यानंतर मी गेलो तेव्हा तिला कळविण्यासाठी फोन केले. परंतु तिने नंतर मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मला परत ये म्हणू लागली. असे त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना परत दिल्लीला जाऊ दिले. परंतु नंतर काही दिवसांनी २५ एप्रिल रोजी त्यांनी भरोसा सेलमध्ये धाव घेतली. तेथे आपला पती दुसऱ्या बाईसोबत दिल्लीत राहात आहे. त्यामुळे तो माझे फोन, मेसेजेस घेत नाही. ते निवृत्त झाल्यानंतर बदलले आहेत. सतत ऑनलाईन चॅटींग करतात. असंही पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांचे काऊंसलींगही केलं.

७ मे रोजी ते पुण्यात आले परंतु ते हॉटेलमध्ये राहतात. त्यामुळे त्यांनी माझ्या सोबत राहावे अशी इच्छा त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्यांना बोलवून घरी राहण्यास सांगितले. बक्षी तिच्याकडे राहण्यासाठी गेले.

पोलिसांनी केली सुटका
त्यानंतर ८ मे रोजी रितू यांनी पोलिसांना मेसेज करून सांगितले की, ते दोघे आता व्यवस्थित राहात आहेत. आणि त्याच वेळी राजीव यांचे वडील वेद प्रकाश यांनी दिल्लीहून पोलिसांना फोन केला आणि माझ्या मुलाचा फोन बंद आहे. मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे मला कृपया मदत करा.

घरी गेल्यावर पोलिसांनी पाहिले असं काही
पोलिसांनी यानंतर दोघांचेही फोन लावून पाहिले तेव्हा ते बंद होते. त्यानंतर ५ पोलिसांचे पथक ९ मे रोजी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी घराला कुलुप असल्याचे आढळले. रितूने त्यातील एका पोलिसाला मेसेजही केला की आम्ही बाहेर गेलो आहोत. परंतु पोलिसांनी पोलिसांना संशय आला. त्यांनी लवकर घरी य़ेण्यास सांगितलं. परंतु ते न आल्याने पोलिसांनी दार तोडण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हा आतून रितू यांनी आवाज दिला. आणि दार तोडू नका असे सांगितले. तेव्हा तिने दार उघडले. परंतु आत गेल्यावर राजीव नव्हते. त्यामुळे पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा राजीव बक्षी बेडरूमध्ये होते. ते बेशुध्द होते. त्यांच्या बेडरुमलाही लॉक लावलेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले.