भिवंडीतून 1 कोटी 13 लाखांचे ब्राऊन शुगर, MD जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ब्राऊन शुगरसह अंमली पदार्थांची तस्करी करणा-या दोघांना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 22) अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी 13 लाख 59 हजारांचे ब्राऊन शुगर आणि एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जाहीद शेख (30 रा. मुठवल, भिवंडी) आणि ईश्वर मिश्रा (39 रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपींना 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक 21 डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सावद नाका येथून पिसा डॅमच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर दोघेजण एका उभ्या असलेल्या कारमध्ये संशयास्पदरित्या आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे जाहीद आणि ईश्वर असे सांगितले.

या दोघांच्या कारची पोलिसांनी झडती घेतली. तेव्हा त्यांच्या कारमधील डिक्कीतील डब्यातून एक किलो 70 ग्रॅम वजनाचा ब्राऊन शुगर आणि एक किलो 700 ग्रॅम वजनाची एमडी पावडर तसेच एक डिजिटल वजन काटा असा एक कोटी 13 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली आहे. त्यांनी या गुन्हयाची कबूलीही दिली आहे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.