Drugs Case : मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढल्या, 18 जानेवारीपर्यंत NCB च्या कोठडीत राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्जशी संबंधीत प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना 18 जानेवारीपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. समीर खान यांच्याशिवाय अन्य दोन आरोपी राहिल फर्नीचरवाला आणि करण सजनानी यांना 16 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले आहे. विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले की, आम्ही पुढील तपासासाठी समीर खान यांना फर्नीचरवाला आणि सजनानी यांना आमने-सामने आणणार आहोत. त्यांनी म्हटले की, आम्हाला मारिजुआना आणि इतर प्रोसेस्ड ड्रग्जची काही छायाचित्रे मिळाली आहेत ज्यावर ते काम करत होते. सरपांडे यांनी म्हटले, समीर खानच्या काही चॅटवरून या गोष्टीचे संकेत मिळतात की, तो मारिजुआनामध्ये सीबीडी तेल आणि इतर रसायने मिसळून एखादे वेगळे ड्रग बनवण्याची योजना आखत होता.

सरपांडे यांनी म्हटले की, आम्हाला समजले आहे की, येथे करण आणि समीर खानमध्ये अनेक व्यवहार झाले आहेत, जे 20 हजार रुपयांपेक्षा जास्त होते. त्यांनी म्हटले की, तो ड्रग्जच्या व्यावसायिक हालचालींमध्ये सहभागी होता, यासाठी आम्ही त्याच्याविरूद्ध 27ए एनडीपीएस कायदा लागू केला आहे. अधिकार्‍याने सांगितले की, तपासादरम्यान आम्हाला त्याच्या फोनमधून अनेक गोष्टी रिकव्हर करायच्या आहेत, आम्हाला जे हवे आहे त्यापैकी आतापर्यंत केवळ 20% रिट्रीव्ह होऊ शकले आहे. तिनही आरोपींना आमने-सामने आणले जाईल, ज्यानंतर तपासाला वेग येईल.

सरपांडे यांनी समीर खानला राजकीय लक्ष्य करण्यात आल्याची बाब फेटाळत म्हटले की, हा आरोप खरा नाही. समीर खानला फॉलोअप तपासात अटक करण्यात आली होती आणि जेव्हा हा तपास सुरू झाला होता तेव्हा आम्हाला त्याच्याबाबत काहीही माहिती नव्हती.

समीर खान यास अंमली पदार्थासंबंधी एका प्रकरणात एनसीबीने बुधवारी अटक केली होती. या प्रकरणी ब्रिटिश नागरिक करण सजनानी आणि दोन अन्य लोकांना मागील आठवड्यात 200 किलोग्रॅम अंमली पदार्थांसोबत अटक केली होती. एनसीबीच्या पथकाने गुरुवारी उपनगर बांद्रामध्ये समीर खानच्या घरावर छापा टाकला, येथून काहीही जप्त करण्यात आले नाही. एनसीबीने समीर खानला अनेक तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती.

समीर खानला ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी आणि त्याच्यामध्ये 20,000 रुपयांच्या कथित ऑनलाइन व्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर एजन्सीने ताब्यात घेतले.

एजन्सीने मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानाचा मालक रामकुमार तिवारी यास अटक केली होती.