लोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल कॅनडातून आल्याचं स्पष्ट

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन –   कॅनडातून लोणावळ्यातील टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयात आलेले 1 किलो 36 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थांचे पार्सल (drugs Smuggling ) आढळून आले. या प्रकरणी अमलीपदार्थविरोधी दलाने ( (NCB) ) सापळा रचून दोघांना अटक केली आहे.या पार्सलची आंतरष्ट्रीय बाजारातील किंमत 50 ते 55 लाख रुपये आहे.

श्रीमय परेश शहा (वय 26, रा. अहमदाबाद, गुजरात) आणि ओंकार जयप्रकाश तुपे (वय 28 रा. नेरूळ, नवी मुंबई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. . राहुल पानसारा (रा. शांतिवन सोसायटी, नांगरगाव, लोणावळा) यांच्या नावे अमली पदार्थांचे पार्सल आले होते. या प्रकरणी पानसारा यांची एनसीबीच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.

मुख्य टपाल कार्यालयात शुक्रवारी कॅनडातून पार्सल आले. हे पार्सल घेण्यासाठी आलेल्या श्रीमय आणि ओंकार यांना एनसीबीने शुक्रवारी दुपारी अटक केली. पार्सलमधील पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील 50 ते 55 लाख रुपये आहे. हे पदार्थ कॅनडातून मुंबई आणि अहमदाबादमार्गे परिसरात येत असल्याची माहिती मिळाली होती.

लोणावळा, खंडाळा आणि मावळ परिसरात गेल्या काही वर्षांत झालेल्या रेव्ह पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतनेही पवना धरण परिसरात फार्महाउस भाड्याने घेतले होते. या फार्महाउसमध्ये आणि परिसरात पार्टी झाल्याचे तपासात उघड झाले होते. पाच वर्षांपूर्वी याच फार्महाउसपासून काही अंतरावरील एका बंगल्यात रेव्ह पार्टी ( (Rav party) झाली होती. या पार्टीतून 40 जणांना ताब्यात घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून लोणावळा आणि परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच कामशेत येथील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून करोडो रुपयांचा गांजा जप्त केला होता.

You might also like