ATS ने पाकिस्तानचा मोठा ‘कट’ उधळला, 175 कोटींचे ड्रग्ज जप्त

गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून कराची बंदर हे जवळ आहे. त्यामुळे या भागातून सागरी मार्गाने कायम घुसखोरी केली जाते. असाच एक प्रयत्न गुजरात ATS आणि तटरक्षक दलाने उधळून लावला. एका पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसली असून त्यामध्ये अंमली पदार्थ आहेत अशी माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्या आधारे एटीएस आणि तटरक्षक दलाने संयुक्त मोहिम राबवत संशयीत बोट पकडून त्यावरील पाच जणांना अटक केली.

याप्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. इसा भाट्टी (वय-30), इस्माईल मोहम्मद कच्छी (वय-50), आश्रफ उस्मान कच्छी (वय-42), करीम अब्दुल कच्छी (वय-37), अबुबकर अश्रफ सुमर (वय-55) अशी अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची नावे असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरु आहे.

गुजरात एटीएसला या प्रकरणी शुक्रवारी गुप्त माहिती मिळाली होती. गुजरातच्या किनाऱ्यावर ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर एटीएसने ही माहिती तटरक्षक दलाला दिली. त्यानंतर दोघांनी संयुक्त मोहिम आखत किनाऱ्यावर करडी नरज ठेवली. त्यावेळी एक बोट संशयास्पदरित्या येत असल्याचे आढळून आली. त्यांनी बोटीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी जबरदस्तीने बोट अडवून बोटीची झडती घेतली. त्यावेळी या बोटीतून हेरॉईनची एक किलोची 35 पाकिटं आढळून आली. हेरॉईनची 35 पाकिटं जप्त करण्यात आली असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 175 कोटी रुपये एवढी किंमत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/