गोव्यात मंदी असतानाही पहिल्या साडेसात महिन्यात 4.62 कोटींचे ड्रग्स जप्त !

पोलीसनामा ऑनलाईन, मडगाव, दि. 18 ऑगस्ट : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण राज्यात मंदी आहे, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अंमली पदार्थांच्या व्यसवसायात तेजी असल्याचे आढळून आले. यंदा पहिल्या साडेसात महिन्यात गोव्यात सुमारे 4.62 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘नशामुक्त भारत’ हे जरी स्वप्न असले तरी ‘नशामुक्त गोवा’ ही केवळ कल्पना असल्याचे सिद्ध करणारी ही आकडेवारी आढळून येत आहे. संपूर्ण राज्य स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना वागातोर इथल्या कपील झवेरी या सिने अभिनेत्याच्या विल्हात रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीवर छापा टाकला असता 9 लाखांचे सिंथेटिक ड्रग्स आढळले. यावेळी तीन विदेशी महिलांसह एकूण 23 जणांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या आकडेवारीप्रमाणे यंदा 15 ऑगस्टपर्यंत या व्यवसायात सामील असलेल्या सुमारे 70 जणांना अटक केली असून त्यात 23 विदेशी, 36 देशी तर 21 गोवेकरांचा समावेश आहे.

उत्तर गोव्यातील पेडणे आणि बारदेसपर्यंतचा समुद्री पट्टा हा व्यवसायाचे मुख्य केंद्र आहे. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात या भागातून सुमारे 2.42 कोटींचे अमली पदार्थ पकडले होते. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात हा व्यवसाय काही प्रमाणात मंदावला होता. मात्र, आता तो पुन्हा तेजीत आल्याचे आढळून येत आहे.

जानेवारी महिन्यात पाच मोठी प्रकरणे उघडकीस आली होती, त्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरगाव येथे एका नायजेरियनला अटक केली असता त्याच्याकडे 50 लाखांचा मुद्देमाल आढळला होता. 6 जानेवारी रोजी वागातोर येथे धाड टाकली असता म्हापसा येथील प्रितेश जाधव याच्याकडे 3 लाखांचा माल आढळला होता.

तर, 7 जानेवारीला शिवोली येथे एका जर्मन नागरिकाला अटक केली असता त्याच्याकडे 75 लाखांचे एलएसडी पेपर्स आढळले होते. याच महिन्यात शिवोली आणि अंजुना येथे दोन नायजेरियनाना अटक केली असता त्यांच्याकडे प्रत्येकी सहा लाखांचा मुद्देमाल सापडला होता.

फेब्रुवारी महिन्यात हरमल येथे एका टर्कीश निवृत्त कमांडोला अटक केली होती. त्याच्याकडे 71 लाखांचा माल सापडला होता. तर, त्याच महिन्यात मांद्रे येथे हिमाचल प्रदेशच्या दोघांना अटक केली होती, त्यांच्याकडे 95 लाखांचा चरस आढळला होता.

तर, मार्च महिन्यात शिवोली येथेच एका रशियन व्यक्तीच्या बंगल्यावर धाड टाकली असता तो चक्क येथे गांजाची लागवड करत असल्याचे आढळले होते. त्याच्याकडून सुमारे 1.60 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.