काय सांगता ! होय, पैसे काढताना त्याचं कार्ड ATM मध्ये अडकलं, तरूणानं चक्क ‘मशिन’च फोडलं

पोलिसनामा ऑलनाईन टीम – एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी स्वाइप केलेले कार्ड अडकले, बराच वेळ प्रयत्न करुनही ते कार्ड न निघाल्याने नशेत असलेल्या या तरुणाने थेट मशिनची तोडफोड केली. मुंबईतील कांदीवलीमध्ये एका 26 वर्षाच्या तरुणाला एटीएम मशिनची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय कुमार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो मालाड पश्चिमचा रहिवासी आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये गुरूवारी दुपारी 12.38 वाजण्याच्या सुमारास कॉल आला. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेंट्रीअम मॉलमध्ये एक तरुण अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएमची तोडफोड करत असल्याची माहिती फोन करणार्‍याने दिली. कंटृोलने तातडीने समता नगर पोलिसांना याबाबत अलर्ट केले. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.

पण त्यावेळी तिथे कोणीही नव्हते. त्यानंतर पोलिसांनी फोन करुन माहिती देणार्‍याशी संपर्क साधून तोडफोड करणार्‍या व्यक्तीचे वर्णन विचारले. तसेच ती व्यक्ती कोणत्या दिशेने गेली याची माहिती पोलिसांनी घेतली. त्या दिशेने आरोपीचा तपास सुरू केला असता पोलिसांना क्रांती नगर रिक्षा स्टँड जवळ एक बाइक उभी दिसली. बाइकस्वार बाइक पार्क करुन झोपडपट्टीमध्ये पळून गेल्याचे तिथल्या काही लोकांनी पोलिसांना सांगितले. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.