चोरी करण्यासाठी घरात घुसला चोर अन् सोफ्यावर झोपला, मालकीणीनं छडीनं मारून उठवलं

उप्पीनगडी (कर्नाटक) : वृत्तसंस्था – एका घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटा घरात घुसला मात्र, असे काही झाले की त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार कर्नाटकातील दक्षिण कन्नडमधील उल्लास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पीनगडी या ठिकाणी घडला आहे. अनिल सहानी (रा.मजीपूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी घरमालक सुदर्शन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सहानी हा सराईत गुन्हेगार आहे. घटनेच्या दिवशी तो दारूच्या नशेत फिर्यादी सुदर्शन यांच्या घराच्या छतावरील कौलारू काढून त्याने घरात प्रवेश केला. घरातील तिजोरीच्या चाव्या शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. घराच्या चाव्या टीव्हीच्या ड्रॉव्हरमध्ये त्याला सापडल्या. चावी शोधण्यामुळे आणि दारून पिल्याने तो थकून गेला. घरातील सोफ्यावर तो बसला असता त्याला झोप लागली.
सकाळी घरमालक सुदर्शन यांना घोरण्याचा आवाज ऐकायला आला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता एक व्यक्ती सोफ्यावर झोपल्याचे त्यांना दिसले. त्यांनी एका लाकडी काठीने त्याला मारुन झोपेतून जागे केले. आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने घरातील सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. घरमालकांनी शेजाऱ्यांना बोलावून चोरट्याला बेदम चोप दिला. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अनिल या चोरट्याला अटक केली.