मद्यधुंद तरुणीची पुण्यातील महिला पोलिसांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पहाटे रस्त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने गोंधळ घातला. तिला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसांनाच तिन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला अटक केली आहे. सोनल सुनील सद्रे (वय-30 रा. सद्रेवाडा, भराड गल्ली, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौक ते शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दरम्यान बुधवारी (दि.५) पहाटे दोनच्या सुमारास घडला.

याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी पुजा हरिदास सारसर (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुजा सारसर या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्यरत आहेत. बुधवारी पहाटेच्या दोनच्या सुमारास एक तरुणी पादुका चौकामध्ये दारुच्या नशेत गोंधळ घालत असल्याचा कॉल पोलिसांना आला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक मुलगी दारुच्या नशेत गोंधळ घालत असल्याचे दिसून आले.

महिला पोलीस कर्मचारी पुजा सारसर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुकी करून लाथाबुक्क्यांनी मारहाणीची धमकी दिली. पोलिसांनी तिला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.