दारूबंदीच्या काळात चंद्रपुरात बनावट दारूमुळे 18 जणांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दारूबंदीच्या काळात विषारी व बनावट दारू पिऊन चंद्रपूर जिल्ह्यात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात 63 लोकांचा बळी गेला. मद्यसेवनामुळे झालेल्या आजारात 467 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी दारूबंदी समीक्षा समितीच्या अहवालातून समोर आली आहे. जिल्हा दारूबंदी समीक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना अहवाल सोपवला.

विषारी व बनावट दारू पिल्यामुळे 2015 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत 18 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे 2010 ते 2014 या कालावधीत 107 अपघात झाले आहेत. त्यामध्ये 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2015 ते 2019 या काळात 63 लोकांचा अपघातात बळी गेला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालण्याच्या 1 हजार 138घटना घडल्या आहेत.

शहर व ग्रामीण भागात दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 467 सांगितली आहे. त्यामध्ये चंद्रपूर शहरात 136 मृत्यू तर ग्रामीण भागात 331 मृत्यू झाले आहेत. मद्यसेवनामुळे 17 हजार 736 लोक विविध आजाराने ग्रस्त आहेत. मद्य सेवन करीत असलेल्यांची संख्या 10 हजार 212 सांगण्यात आली आहे. दारूबंदीच्या अहवालाची समीक्षा करण्यासाठी शासनाने तज्ज्ञांचा सहभाग असलेली उच्चस्तरीय समिती नेमावी अशी शिफारस समीक्षा समितीने केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यत दारूबंदीनंतर अवैध दारूविक्री, मद्य तस्करी, दारूबंदीचे गुन्हे 198 टक्के, दारूविक्रेत्या आरोपींची संख्या 193 टक्के आहे. अवैध दारूविक्रेत्या महिला आरोपींची संख्या 138 टक्के तर यातीलच बाल गुन्हेगारांच्या संख्येत 1 हजार 158 टक्के वाढ झाली आहे. शिवाय दारूबंदी करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर जीवघेण्या हल्ल्यातही वाढ झाली आहे.