सारखंच ‘कोरडा’ खोकला येत असेल तर घ्या ‘अशी’ काळजी, जाणून घ्या उपाय

पोलीसनामा ऑनलाईन : आजच्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना कोरड्या खोकल्याची लागण दिसून येत आहे. श्वासनलिकांच्या अनेक सामान्य आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. हा खोकला अचानक वाढतो, आणि सततच्या खोकल्याने व्यक्ती हैराण होऊन जाते. सध्या या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

१) आपण थंड हवेत नाकाने श्वास घेतल्याने हवेतील गारव्यामुळे नाकाच्या आतील पातळ म्युकस मेम्ब्रेनला (मांसल आवरणाला) सूज येते. ज्यामुळे सर्दी होते. आपण जर लवकरात लवकर काळजी घेतली नाही तर ही सर्दी घट्ट होते. ज्याला ‘कफ’ म्हणतात. हा कफ नाक आणि घसा यांच्यामध्ये अडकून राहतो. हा कफ, आपल्या श्वासाबरोबर बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे कोरडा खोकला येऊ लागतो.

२) नाकाच्या आतील हे पातळ आवरण त्यापुढे घसा, टॉन्सिल्स, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसातील वायुकोषांपर्यंत आतील बाजूने पसरलेले असते. त्यामुळे हा कोरडा खोकला जसजसा वाढत जातो तो फुफ्फुसांपर्यंत पसरतो.

३) त्यात धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे अधिक भर पडते.

४) लहान मुलांमध्ये टॉन्सिल्सच्या ग्रंथींवर सूज येऊन कोरडा खोकला येतो.

५) चाळिशीनंतर दीर्घकाळ असलेल्या कोरड्या खोकल्यात घशात कर्करोगाची सुरुवात असू शकते.

काळजी :

१. थंडीच्या काळात सकाळी लवकर किंवा रात्री उशीरा बाहेर पडणे टाळावे.

२. शाळा, कॉलेज, ऑफिस, व्यवसायधंदा यासाठी सकाळी बाहेर पडताना अंगात स्वेटर बरोबर नाकाला स्कार्फही बांधावे.

३. दिवसातून चार वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे घशाची सूज आणि कफ कमी होतो.

४. सूर्यास्तानंतर आणि सकाळी उन्हे पडेपर्यंत घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात.

५. अंगावर गरम कपडे तसेच झोपताना उबदार पांघरूण घ्या. थंडी जास्त असल्यास झोपतानासुद्धा कानटोपी वापरावी.

६. एक वर्षापेक्षा लहान मुलांची थंडीत रोज संध्याकाळी आणि सकाळी छाती, पाठ, कपाळ, कानशिले शेकावे.

उपचार :

जर ह्या कोरड्या खोकल्याचे प्रमाण कमी असेल तर गुळण्या आणि घरगुती उपाय करणे उपयोगाचे ठरते. मात्र खोकल्याबरोबरच घसा दुखत असेल, तसेच ताप आल्यासारखे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच यासोबत दम लागू लागला किंवा श्वास घेताना छातीतून सूं सूं आवाज येऊ लागल्यावर झोपल्यावर जास्त खोकला येणे, आवाज बदलणे यांसारखा काही त्रास असेल आणि खोकला पाच दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असते.