Coronavirus : ‘कोरोना’ लसीकरणाचे ‘ड्राय रन’ यशस्वी, केंद्र सरकार समोरील मार्ग मोकळे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा करत आहे. सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लसीला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परवानगी मिळेल, असा आशावाद सिमरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सोमवारी व्यक्त केला. त्यातच आता कोरोना लस देण्यापूर्वी करण्यात आलेले ड्राय रन यशस्वी झाल्याची माहिती, भारत सरकारने दिली आहे. पंजाब, आसाम, आंध्र आणि गुजरात या राज्यांत ही मॉक ड्रिलसारखी चाचणी घेण्यात आलेली.

येथे चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरु करण्यासाठी निर्धारित पद्धती तपासण्यात आल्या. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांत लसीची ड्राय रन चाचणी घेण्यात आली. ड्राय रनच्या साहाय्याने खऱ्या लसीकरणासाठी आवश्यक संपूर्ण तयारी केली जाणार आहे. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, आजवर सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत ७००० हजार हुन अधिक जिल्हास्तरीय प्रशिक्षणार्थींच्या सहभागाने कोरोना लसीकरणाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर लक्षद्वीपमध्ये आज प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ड्राय रनमध्ये काय काय…
ड्राय रनमध्ये कोणाला प्रथम लस द्यायची आणि कोणाला लस मिळणार नाही, याचा डेटा घेण्यात येतो. यासाठीची माहिती cowin app वर अपलोड केली आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरीकांना लस टोचवण्याची माहिती सरकारने दिली आहे. त्यानुसार प्रथम गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांना, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ५० वर्षावरील नागरिकांना लस दिली जाईल.