संसदेवरील हल्ल्यात काश्मीरचा ‘बडतर्फ’ DSP दविंदर सिंहच्या सहभागाचा होणार तपास

जम्मू : वृत्तसंस्था – अतिरेक्यांबरोबर कारमध्ये सापडलेल्या पोलीस उपायुक्त दविंदर सिंह याचा संसदेवर 2001 मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात काही हात होता का याचा तपास करण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी याबाबत माहिती दिली. 2001 मध्ये अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्यात दविंदर सिंह यांची काही भूमिका होती का याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे. याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे.

दविंदर सिंह याच्याकडे चौकशी करताना सर्व पैलुकडे लक्ष देणार असून कोणताही मुद्दा नजरअंदाज केला जाणार नाही, असे दिलबाग सिंह यांनी सांगितले. संसदेवर हल्ला करणाऱ्यांना मदत करणाऱ्या अफजल गुरु याने लिहिलेल्या एका पत्रावरुन 2013 मध्ये दविंदर सिंह हा चर्चेत आला होता. यात संसदेवर हल्ला करणाऱ्या आरोपींना बरोबर घेऊन तो दिल्लीत आला होता व त्याने त्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते, अशी माहिती अफजल गुरु याने या चिठ्ठीत दिली होती. अफजल गुरु याला फाशी दिल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी ही चिठ्ठी उघड केली होती. त्यानंतरही केंद्र सरकारने त्याची पुरेशी दखल घेतली नाही. त्यामुळे त्याचे अतिरेक्यांना मदत करण्याचे कारनामे सुरुच राहिले होते.

श्रीनगरमधील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात दविंदर सिंह याचे घर असून त्यात त्यांनी अतिरेक्यांना आश्रय दिला होता, अशी माहिती पुढे आली आहे. प्रजासत्ताक दिनी पंजाब किंवा दिल्लीमध्ये अतिरेकी हल्ला घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव होता. त्यामुळे या अतिरेक्यांना दिल्लीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी दविंदर सिंह याने घेतली होती. जम्मू श्रीनगर महामार्गावर हिजबुल अतिरेक्यांना कारमधून घेऊन जाताना तो आढळून आला होता. कारची तपासणी करीत असताना त्यात शस्त्रे आढळल्याने हा कट उघडकीस येऊन वरिष्ठ पोलीस अधिकारीच अतिरेक्यांना सामील असल्याचे उघड झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/