‘कोरोना’ची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार बिलात सूट, रेस्टॉरंटकडून ‘ऑफर’

पोलीसनामा ऑनलाईन – जगभरातील अनेक देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र याच दरम्यान लसीचे काही साईड इफेक्टस समोर आल्याने लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाले आहे. लसीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असतानाच अनेक लोक आणि संस्था लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करताना दिसत आहे. दुबईतील रेस्टॉरंटमध्ये देखील असाच अनोखा प्रकार पाहायला मिळाला आहे. एका रेस्टॉरंट मालकाने कोरोनाची लस घेणाऱ्या ग्राहकांना खाण्याच्या पदार्थात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले आहे.

दुबईसह सात आमिरातीपासून मिळून तयार झालेल्या यूएईने डिसेंबरपासून व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. यातील एक कोटी लोकसंख्येतील एक चतुर्थांश म्हणजे केवळ 25 हजार लोकांनी लस घेतली आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यास 10 टक्के आणि दुसरा डोस घेतल्यास 20 टक्के डिस्काऊंट मिळणार असल्याची हटके ऑफर दिली आहे. लंच, डिनर आणि ब्रेकफास्टवर सवलत हवी असल्यास ग्राहकांना कोरोना लस घेतल्याचा पुरावा म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बिलावर आपोआप सूट मिळणार आहे. गेट्स हॉस्पिटॅलिटीअंतर्गत सुरू असलेल्या दुबईतील तीन रेस्टॉरंटने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.