दुबईच्या शासकाची पत्नी राजकुमारीचे बॉडीगार्डशी संबंध; ‘तोंड’ बंद ठेवण्यासाठी दिले 12 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमची राजकुमारी पत्नीचा आपल्या बॉडीगार्डशी संबंध होता. राजकुमारी हयाने बॉडीगार्डला त्यांचे नाते लपवण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपये दिले होते. डेली मेलने ब्रिटिश कोर्टाच्या सुनावणीच्या आधारे हा दावा केला आहे. दुबईच्या शासकने राजकुमारी हयाला न कळविता शरिया कायद्यांतर्गत फेब्रुवारी 2019 मध्ये घटस्फोट दिला होता.

अहवालानुसार, राजकुमारी हयाचा बॉडीगार्ड विवाहित होता. पण अफेअरमुळे बॉडीगार्डचे लग्न मोडले. राजकुमारी हयाने दुबई सोडली आहे आणि बर्‍याच वर्षांपासून ती ब्रिटनमध्ये राहत आहे. मुलांच्या कस्टडीबाबत राजकुमारी हयाने यूकेच्या कोर्टात खटला दाखल केला होता आणि हयाच्या बाजूने निकाल लागला होता.

राजकुमारी हया आपल्या बॉडीगार्डला खूप महागड्या भेटवस्तू देत असे ज्यामध्ये 12 लाखांचे घड्याळ आणि 50 लाखांची बंदूक यांसारख्या वस्तूंचा समावेश होता. राजकुमारी हया दुबई शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमची सहावी आणि सर्वांत लहान पत्नी होती. हे प्रकरण 2016 मध्ये सुरू झाले होते आणि त्यानंतरच तो बॉडीगार्ड राजकुमारी हयासाठी पूर्णपणे काम करायला लागला.

या वृत्तानुसार, 46 वर्षीय राजकुमारी हयाचे 37 वर्षांचे ब्रिटनचे बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरसोबतचे अफेअर सुमारे 2 वर्षे चालले. असेही म्हटले जाते की, रसेलशी असलेले संबंध लपवण्यासाठी हयाने रसेलसह अन्य तीन बॉडीगार्डला कोट्यवधी रुपये दिले होते.

राजकुमारी हया 2018 मध्ये दुबईहून पळून गेली होती आणि आता लंडनमध्ये राहत आहे. ती दोन मुलांची आई आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर यांच्याशी संपर्क साधला असता, त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचबरोबर, राजकन्या हयानेही रसेलशी संबंधित असलेल्या काही दाव्यांना नकार दिला आहे.