दुबईतील ‘त्या’ रूग्णालयाने भारतीयाला आकारले चक्क १८ लाखांचे बील

पोलीसनामा ऑनलाईन – संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईतील दुबईमध्ये आपल्या मुलाला भेटायला गेलेल्या एका ६६ वर्षीय भारतीय व्यक्तीची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे तातडीने त्यांना येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले; पण या ठिकाणी उपचार करताना त्यांचे बिल चक्क १८ लाख रुपयांच्या घरात गेल्याची घटना समोर आली आहे.

मूळचे पंजाबचे असलेले सुरेंद्रनाथ खन्ना आपल्या पत्नीसह मुलाला भेटण्यासाठी १४ मार्च रोजी दुबईला गेले; पण दुसऱ्या दिवशी त्यांना श्वसनासंबंधी त्रास सुरू झाल्याने तातडीने दुबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना फुप्फुसाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. खन्ना यांचा मुलगा अनुभवकडे आपल्या पालकांसाठी कुठल्याही प्रकारचा प्रवासी किंवा वैद्यकीय विमा नव्हता.

त्यामुळे वडिलांवरील उपचारासाठी त्याला प्रत्येक दिवसाला तब्बल तीन लाख रुपये मोजावे लागले. आतापर्यंत उपचाराचे बिल १८ लाख रुपयांच्या घरात गेले. त्यामुळे ११ महिन्यांपूर्वीच दुबईमध्ये स्थलांतरित झालेल्या अनुभवसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. यानंतर यूएईतील भारतीय महावाणिज्य दूतावासाचे प्रमुख नीरज अग्रवाल यांनी भारतीय समुदायाला पुढे येत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.