… म्हणून आदित्य ठाकरेंची कॅबिनेटमध्ये ‘एन्ट्री’ ?

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – काल उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला, यावेळी ठाकरे सरकारमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना मंत्रीपदी संधी देण्यात आली. यामध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेले आदित्य ठाकरे यांची देखील कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याचे पहायला मिळाले. आदित्य हे मंत्रीमंडळातील सर्वात तरुण मंत्री असणार आहेत.

तसेच काहीसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळाले नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे आणि आदिती तटकरे यांच्यावर देखील मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र एवढे दिवस पक्षासाठी काम केलेल्या अनेक अनुभवी नेत्यांना यावेळी डावलले गेल्याने दोनीही पक्षांमधून नाराजीचे सूर उमटल्याचे पहायला मिळाले आहे.

उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असल्यामुळे आता आदित्य ठाकरे हे पक्ष संघटनेकडे लक्ष देतील अशी आशा वर्तवली जात होती. मात्र आदित्य यांना देखील कॅबिनेटमध्ये स्थान देऊन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते त्यावेळी एक आमदार कॅबिनेट बैठकीत कसा काय असा प्रश्न सर्वांना पडला होता.

मात्र आता आदित्य ठाकरे स्वतः कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून सर्व कामकाजाचा अनुभव घेऊ शकणार आहेत आणि यामुळेच त्यांना कॅबिनेट मंत्री पदी नियुक्त केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/