प्रचारासाठी ‘डयुप्लीकेट’ विराट कोहली आणणारा गावचा सरपंच ‘गोत्यात’ ; जातीचा दाखला बनावट असल्याने सरपंचपद रद्द

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन : निवडणुकीत हटके प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या जातात. अशीच एक कल्पना शिरूर गावचे सरपंच विठ्ठल घावटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत वापरली होती. शिरूर ग्रामीण गावचे सरपंच विठ्ठल घावटे यांनी प्रचारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीला आणले होते. त्यामुळे घावटे चर्चेत आले होते.

आता हे सरपंच घावटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी बनावट कोहली आणणाऱ्या घावटे यांच्या जातीचा दाखला बनावट असल्याचे आढळून आले आहे, एवढेच नाही तर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्याआधारे त्यांचे सरपंचपद रद्द ठरवले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण गावाचे सरपंच विठ्ठल गणपत घावटे यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आले आहे. त्याविरोधात संपत जाधव आणि नामदेव जाधव यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी गणपती घावटे या नावाशी साधर्म्याचा फायदा घेत कुणबी प्रमाणपत्र दाखल केल्याचे समोर आले आहे. त्यावर घावटे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने समितीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत सरपंचपद रद्द ठरवले आहे.