Cyclone Nisarga : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या

मुंबई : चक्रीवादळ निसर्गच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई टर्मिनलहून रवाना होणार्‍या आणि येणार्‍या काही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. तर काही गाड्या ज्या मुंबई टर्मिनलवर येणार होत्या, त्यांना थांबवण्यात आले आहे. तसेच एका ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. दरम्यान, संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि दमण, गुजरात येथे वेगाने वारे वाहत असून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईहून सुटणार्‍या रेल्वे गाड्यांची बदललेली वेळ

* एलटीटी-गोरखपूर विशेष ट्रेन सकाळी 11. 10 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार.
* एलटीटी-थिरुअनंतरपुरम विशेष ट्रेन सकाळी 11.40 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता सुटणार.
* एलटीटी-दरभंगा विशेष ट्रेन दुपारी 12.15 ऐवजी रात्री 8.30 वाजता सुटणार.
* एलटीटी-वाराणसी विशेष ट्रेन दुपारी 12.40 ऐवजी रात्री 9 वाजता सुटणार.
* सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष ट्रेन दुपारी 3 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार.

या रेल्वे उशिराने मुंबईत येणार

* सकाळी 11.30 वाजता मुंबईत येणारी पाटणा-एलटीटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने येईल.
* दुपारी 2.15 वाजता मुंबईला येणारी वाराणसी-सीएसएमटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने येईल.
* दुपारी 4.40 वाजता येणारी थिरुअनंतपुरम-एलटीटी स्पेशल ट्रेन पुण्याला वळवून एलटीटीला नियोजित वेळेपेक्षा उशिराने येईल.

वादळाला तोंड देणसाठी सर्व यंत्रणा सज्ज

मुंबई आणि अन्य समुद्र किनार्‍यावर निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने मुंबईसह अन्य जिल्ह्यातील पोलीस दल आणि प्रशासन सज्ज झाले आहे. कोळीवाडे आणि अलिबाग किनार्‍यावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी तसेच अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने मुंबईतील काही भागात वाहतूकीत बदल केले आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून 280 कि.मी., मुंबईपासून 430 कि.मी. आणि सुरतपासून 640 कि.मी. अंतरावर होते. ताशी 11 किलोमीटर वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढील 12 तासांत वादळाचा वेग आणखी वाढणार आहे. आज दुपारी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्यानचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग पार करून पुढे जाईल. यावेळी ताशी 120 कि.मी. वेगाने वारे वाहतील. तसेच किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.