Coronavirus Lockdown : केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरं खुली होणार ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसने अर्ध्यापेक्षा अधिक जगाला बाधित केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असून महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या लाखांवर गेली आहे. तर मृतांचा आकडा 40 हजारावर पोहचला आहे. कोरोनामुळे इटली, फ्रान्स, इंग्लंड या सारख्या देशातही कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला असून देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसून यावर एकमेव पर्याय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या दरम्यान गोवा आणि मणिपूर हे दोन राज्ये कोरोनामुक्त झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, आता बद्रीनाथ आणि केदारनाथ ही मंदिरं खुली करण्याचे संकेत देण्यात आली आहे.

ही मंदिरं कधी खुली होणार, जाणून घ्या

बद्रीनाथ धाम

बद्रीनाथ धाम, केदारनाथ मंदिरे एप्रिल महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुली केली जातात. सुरुवातीला बद्रीनाथ धाम मंदिर 30 एप्रिल 2020 रोजी खुले करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता आता बद्रीनाथ धाम किंवा बद्रीनाथ मंदिर आता शुक्रवार 15 मे 2020 रोजी पहाटे 4.30 वाजता खुले करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात असलेल्या हिमालय पर्वतरांगांमध्ये बद्रीनाथ मंदिर असून, आद्य शंकराचार्यांनी 9 व्या दशकात बद्रीनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.

केदारनाथ मंदिर

चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचे धाम म्हणजे केदारनाथ मंदिर आहे. उत्तराखंड राज्यातील मंदाकिनी नदीच्या काठावर हे मंदिर आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी देशातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी 29 एप्रिल 2020 रोजी केदारनाथ मंदिर खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हे मंदिर 14 मे 2020 रोजी सकाळी 6.10 वाजता खुले करण्यात येणार आहे.

गंगोत्री धाम

हिमालयाच्या पर्वतांमध्ये असलेल्या मंदिराची स्थापना पांडवांनी केली होती. तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असे मानले जाते. भारतीय संस्कृतीत चार धाम यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र, देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी देशातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. चारधाम यात्रेतील एक महत्त्वाचे धाम असलेले गंगोत्री धाम 26 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी खुले करण्यात येणार आहेत.

यमुनोत्री धाम

यमुनोत्री हे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील 10 हजार 804 फूट उंचीवर असलेले ठिकाण आहे. हे स्थान यमुना नदीचे उगमस्थान आहे. यमुनोत्री उत्तरकाशीच्या 30 किमी उत्तरेस असून ते केदरानाथ बद्रीनाथ व गंगोत्रीसह छोट्या चार धाम यात्रेमधील एक स्थान मानले जाते. यमुनोत्री धाम अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवार 26 एप्रिल 2020 रोजी दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी खुले करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांमध्ये चर्चा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ मंदिरे खुली करण्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देशातील कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरच चारधाम यात्रेला परवानगी देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ही मंदिरे खुली करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. दोन्ही मंदिरे खुली करण्यासाठी योग्य व्यवस्थापन, तयारी प्रशासन करत असल्याचे समजतेय. संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.