…अन् पोलिसांच्या ‘चाणाक्ष’ नजरेमुळे 10 वर्षीय मुलगी सुखरुपणे पालकांच्या ताब्यात

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाइन – स्थळ- उरुळी कांचन बसस्थानक, वेळ सकाळची साठेआठची, स्वाती (नाव बदलले आहे) ही दहा वर्षाय मुलगी भेदरलेल्या अवस्थेत उभी होती. मुलीच्या डोळ्यात पाणी, बस स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी, मात्र रडणाऱ्या स्वातीकडे गर्दीमधील एकाचेही लक्ष गेले नाही. त्याचवेळी दोन पोलिस कर्मचारी चहा पिण्यासाठी बसस्थानकावर येतात काय व त्यांचे मुलीकडे लक्ष जाते व पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत मुलीची अवस्था लक्षात येते. अन् पोलिस मुलीजवळ जाऊन विचारपूस करतात. मुलगी घडलेली घटना सांगते व तासाभरात मुलगी पालकांच्या ताब्यात ही सिनेमा स्टाईल स्टोरी उरुळी कांचन ग्रामस्थांनी रविवारी (दि. 27) अनुभवली. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेला दाद देत त्यांचे कौतुक करण्यात आले.

उमाकांत कुंजीर (पोलिस हवालदार, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा) व महेंद्र गायकवाड (पोलिस हवालदार, लोणी काळभोर पोलिस ठाणे) या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या चाणाक्ष नजरेमुळे व समयसुचकतेमुळे, कात्रजहून एका अनोळखी इसमाने पळवून आणलेली दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सुखरुपपणे संबधित पालकांच्या ताब्यात मिळाली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उरुळी कांचन बस स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. त्याचवेळी उमाकांत कुंजीर व लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील हवालदार महेंद्र गायकवाड चहा पिण्यासाठी बस स्थानकाजवळच्या एका हॉटेलमधे निघाले होते. हॉटेलमध्ये शिरताना कुंजीर यांचे लक्ष अचानक रडणाऱ्या स्वातीकडे गेले. यावर कुंजीर यांनी महेंद्र गायकवाड यांचेही लक्ष स्वाती वेधले. यावर दोघांच्याही चाणाक्ष नजरेला स्वातीच्या वागण्यातील बदल लक्षात आला. यावर कुंजीर यांनी स्वातीजवळ जाऊन विचारपुस करण्याचा प्रयत्न केला. मात्र उमांकात जवळ गेल्याने स्वाती अधिकच रडू लागली.

दरम्यान महेंद्र गायकवाड व उमाकांत कुंजीर या दोघांनी समयसुचकता दाखवत स्वातीला गोड बोलून शेजारच्या हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी गेल्यावर तिला गोड बोलून शांत केले. ती शांत होताच उमाकांत यांनी स्वातीकडून तिच्या बद्दलची माहिती काढून घेण्यास सुरुवात केली. स्वातीने दिलेल्या माहितीनुसार, स्वातीला कात्रजहून एका अनोळखी इसमाने उरुळी कांचन येथे आणल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान ही बाब उरुळी कांचनचे साहय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांना समजताच, तेही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यानच्या काळात कुंजीर यांनी स्वातीबाबत विचारपूस करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला असता, स्वाती देत असलेली माहिती खरी असल्याचे लक्षात आले. यावर पवन चौधरी व उमाकांत कुंजीर यांनी स्वातीच्या पालकांशी संपर्क साधून, स्वातीला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकांच्या हवाली केले.