पुणे : बिबट्याचा हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. श्रृतिका महेंद्र थिटे (वय,5 वर्ष रा. जऊळके, ता. खेड) असे या मुलीचे नाव आहे. दरम्यान, वन विभागाने काल रात्री लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या सापडला असून तो बिबट्याचा बछडा आहे.

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. आता उसतोड झाल्याने त्यांचे आश्रयस्थान उघडे पडले आहे. तसेच पाण्याचे साठे कोरडे पडू लागल्याने बिबटे मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. रविवारी साकोरे येथे श्रृतिका व तिची आई स्वाती थिटे या मामा अंकुश कडुसकर यांच्याकडे पाच दिवसांपासून रहायला आल्या होत्या. आजी कुसुम कडुसकर व स्वाती थिटे या घरासमोरील शेतात जनावरांसाठी मका चारा कापत होत्या. जवळच श्रृतिका खेळत होती. यावेळी मक्क्याच्या पिकात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करुन श्रृतिकाला जबड्यात उचलून पळू लागला. श्रृतिका व दोघींनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून नागरिक धावून आले. तोपर्यंत बिबट्याने श्रृतिकाला टाकून पळ काढला होता.

श्रृतिकाच्या गळ्याला बिबट्या चावल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने मंचर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने रात्री या परिसरात पिंजरा लावला होता. त्यात एक बिबट्या अडकला आहे. हा बिबट्याचा बछडा असल्याचे सांगितले जात आहे.