ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी मृतदेह ठेवला चक्क बँकेत

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – बँकेत असलेली मुदत ठेवीची रक्कम मिळत नाही म्हणून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ठेवीदाराचा मृतदेह जिल्हा सहकारी बँकेत आणुन ठेवला आहे. हा धक्कादायक प्रकार आज (ता. २१) गुरूवारी सकाळी जिल्‍हा सहकारी बँकेत घडला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, लाबराव वीरभद्र परशेट्टी (वय 70) हे एसटीचे सेवानिवृत्त चालक आहेत. निवृत्तीची रक्कम त्यांनी जिल्हा बँकेच्या 3 शाखांमध्ये ठेवली होती. मुदत पूर्ण झाली तरी ठेवी परत मिळत नसल्याने परशेट्टी हैराण झाले होते. बुधवारी ही त्यांनी बँकेत चक्कर मारली होती. पण बँकेकडून त्‍यांना सकारात्‍मक माहिती मिळाली नाही. काल बुधवारी सायंकाळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्‍यातच आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे.

आपली मुदत ठेवीची रक्‍कम मिळत नसल्‍याच्या चिंतेतून परशेट्टी यांना हृदय विकाराचा झटका आल्‍याचे सांगत, त्‍यांच्या संतप्त नातेवाईकांनी ठेवीदार असलेल्‍या परशेट्टींचा मृतदेह थेट जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेच्या दारात आणून ठेवला. या प्रकारामुळे बँकेमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक परशेट्‍टींचा मृतदेह घेऊन निघून गेले आहेत.