दुर्देवी ! अंत्यसंस्काराला पैसे नाही म्हणून अंगणात पुरला भावाचा मृतदेह

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात लॉकडाऊनमध्ये अनेक धक्कादायक धटना समोर आल्या आहेत. अंत्यसंस्काराला पैसे नाही म्हणून भावाने आणि दोन पुतण्यांनी मिळून तरुणाचा मृतदेह अंगणातच पुरला. दरम्यान, त्यांनी शेजार्‍यांना विचारून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खोदला होता. पण त्यात मृतदेह पुरल्याचे समजताच सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारच्या भागलपूरमध्ये ईशाचक पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

कुटूंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गुड्डू मंडल हा कचरा उचलणारा म्हणून काम करत होता. काही दिवसांपासून तो असह्य आजाराने त्रास्त होता. अपस्मार रोगाचा बऱ्याच वेळा उपचार केल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. सकाळी मृताचा भाऊ ओमप्रकाश मंडलने गुड्डूला पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्या दोन मुलांनी नीरज आणि राजा यांच्या मदतीने घराच्या अंगणात एक खड्डा खोदला आणि मृत गुड्डू मंडलचा मृतदेह तिथे पुरला. एका शेजार्‍याने ओमप्रकाश मंडल आणि दोन मुलांना एक मृतदेह लपवताना पाहिले. त्यानंतर शेजार्‍यांनी नगरसेविका कल्पना देवी यांच्यासह ईशाचक पोलीस स्टेशन माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचून अंगण खोदत मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर हत्या की आत्महत्या याचा अंदाज येईल. त्यानुसार पुढील तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.