लग्नसोहळे थांबल्याने कातकरींवर उपासमारीची वेळ, मांगल्याचे प्रतिक चौरंग, पाट, देव्हारा बनविणारे कारागिर झाले बेकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर असो की खेडे मांगल्याचा सोहळा म्हटलं की लाकडी चौरंग, रंगीत पाट, देव्हारा प्राधान्य क्रमाने असलेच पाहिजेत. लग्न श्रीमंताघरचं असो वा गरिबाघरचं… या लग्नासाठी या सर्व वस्तू लग्नात मांगल्य आणि सुंदरता आणण्याचे काम करणाऱ्या हातांना दोन महिन्यांपासून काम नाही. चौरंगावर सनमायका लावून ते सुशोभित करणाऱ्या व लाकडी पाटांना रंगरंगोटी करीत सुशोभित करणाऱ्या कातारी समाजबांधवांच्या जीवनातला रंग व आनंदच जणू कोरोना व्हायरसच्या संसर्गाने हिरावून घेतला आहे. लग्नसोहळा, सत्यनारायणाची महापूजा पूर्ण बंद आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे असा प्रश्न कातारी बांधवांसमोर आहे. ग्रामीण भागातील हा समाज शासकीय मदतीपासून कोसो दूर आहे. मात्र, महामारीच्या भयंकर परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला मदत करावी, अशी मागणी या समाजाकडून होत आहे.

कोरोनाचा संसर्गाने जगभर थैमान घातले आहे त्यामुळे मागिल 22 मार्चपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर सर्वत्र लॉकडाउन असल्याने यंदा लग्नसोहळे झालेच नाहीत. विवाह सोहळ्यासाठी लाकडी चौरंग, पाट, देव्हारे बनविणाऱ्या शिकलगर मंडळी अर्थात कातारी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या ५० दिवसांपासून रोजगार थांबल्याने हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. अर्थार्जनाचे दुसरे साधन नसल्याने राज्यभरातील कातारी समाजबांधव निराश व हताश झाले आहेत. कातारी समाजातील गरजू लोकांना सरकारने आर्थिक मदत करावी, या संकटातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा मनमाड येथील कातारी समाजबांधव व्यक्त करीत आहेत.

ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आठवडे बाजारात जाऊन कुशलतेने बनवलेले लाकडी सामान विकून गुजराण करणाऱ्या या समाज घटकाला न्याय कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. लग्नसोहळे थांबले, त्यांचे मुहूर्तही लांबले; पण गरीब व श्रीमंतांचे लग्नसोहळे आपण तयार केलेल्या चौरंग व पाटाने परिपूर्ण करणाऱ्या, विवाह सोहळ्याला पूर्णत्व देणाऱ्या कातारी समाजबांधवांचे आर्थिक संकटाचे, रोजीरोटी बुडत असल्याचे दिवस संपायला कोणता मुहूर्त, हाच खरा प्रश्न आहे. करोनामुळे आमच्या समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती फारच गंभीर झाली आहे. सरकारने समाजाच्या पाठीशी राहून आर्थिक सहकार्य करावे. कातारी समाजात ज्यांची परिस्थिती चांगली असेल, त्यांनी समाजातील गरिबांना मदतीचा हात द्यावा व त्यांची मदत करावी. कोरोना व्हायरसचा संसर्ग लवकरात लवकर हद्दपार व्हावा आणि सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत, असे परमेश्वराकडे कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजूर वर्गाने साकडे घातले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आठवडी बाजार, यात्रा, जत्रा, उत्सव बंद आहेत. त्यामुळे लग्नसमारंभाशिवाय इतरवेळीही खरेदी करणारा मोठा वर्ग आहे. मात्र, आता आठवडी बाजारसुद्धा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लाकडी फर्निचर बनविणारा कारागिरवर्ग हताश झाला आहे. सामाजिक संस्था, संघटनांनी त्यांना मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून त्यांची अडचण दूर करावी.

बाजारू वस्तू खरेदी करू नका

एकेकाळी चौरंग, पाट, देव्हारा यासह दिवाण, टी-पॉय, कपाट शोकेश अशा अनेक वस्तू बनविणारा कारागिर तुलनेने कमी होता. मात्र, आता या व्यवसायात परराज्यातील मंडळींनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. आकर्षक आणि देखणेपणाला महत्त्व वाढले आहे. मजबूत आणि टिकाऊपणापेक्षा वरच्या रंगाला ग्राहक बळी पडत आहेत. हलके आणि स्वस्त मटेरियल वापरून कमी किमतीमध्ये विक्री सुरू झाली आहे. मात्र, अशा पद्धतीने बनविलेल्या साहित्याची लग्नसमारंभ झाल्यानंतर गाडीमध्ये ठेवतानाच तूटफूट होत आहे. त्यामुळे खरेदीदार आणि पाहुणे मंडळींमध्ये वितुष्ट आणू पाहात आहे. त्यामुळे नागरिकांनीही बाजारू वस्तू खरेदी करू नये, असेही काही कारागिरांनी सांगितले.