शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी ‘यामुळे’ घेतली मागे : जयंत पाटील

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतःची उमेदवारी पार्थ पवार यांच्यासाठी मागे घेतली असल्याचा दावा महाआघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते जयंत पाटील यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिचंवड येथे केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.

मावळ लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना घाटाखालून किती मताधिक्य मिळेल हे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही पण मताधिक्य नक्‍कीच मिळवुन देणार असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी विश्‍वासाने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा कोणत्याही अटवर दिलेला नाही तर देशाच्या राज्य घटनेला वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीत सामील झालो आहोत असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. मी मार्क्सवादी असलो तरी आंबेडकरवादी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पार्थ पवार यांना शेकापचा पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे कारण घाटाखालील बाजुस शेकापचे वर्चस्व आहे. मावळ लोकसभा मतदार संघात येणार्‍या 6 विधानसभा मतदार संघापैकी रायगड जिल्हयातील पनवेल, उरण आणि कर्जत या 3 विधानसभा मतदार संघात शेकापचे चांगलेच वर्चस्व आहे. शेकापच्या वर्चस्वाचा पार्थ पवार यांना चांगलाच फायदा होणार आहे.