डिजिटल इंडियाचे दुर्दैव…!शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून १२वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे  श्रीमंत बापाच्या मुलांकरिता भरमसाठ पैसा ओतूनही ते शिक्षण घेण्यास उत्सुक नसल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. पण शिक्षणाची तळमळ असून देखील केवळ पैशाअभावी शिक्षण घेता न येणारे विद्यार्थी आजही भारताच्या काना कोपऱ्यात सापडतील. नांदेड येथे राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने चक्क शिक्षणाचा खर्च झेपत नसल्यामुळे गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनुजा कांबळे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अनुजा कांबळे ही विद्यार्थिनी शहरातील दीपनगर भागात आपल्या आईसह राहत होती. ती शहरातील शिवाजी महाविद्यालयात इयत्ता १२ वीत शिकत होती. करिअरच्या दृष्टीने १२ वी चे वर्ष महत्वाचे मानले जाते. अनुजाला शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र दोन वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरवले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरामध्ये कोणीही नसताना अनुजाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तत्पूर्वी अनुजाने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे शिक्षणाचा खर्च झेपत नाही, असे तिने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. अनुजाची आई संध्याकाळी कामावरुन परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद भाग्यनगर पोलीस ठाण्यात असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. आजही आपल्या डिजिटल इंडियात शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या होते ही बाब दुर्दैवीच मानावी लागेल.