माजी आमदाराच्या दबावामुळं गुन्हा दाखल नाही ?, बेलवंडी पोलिस ठाण्याविरोधात बेमुदत धरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोळगाव ( ता. श्रीगोंदा) येथील पारधी समाजातील महिला व पुरुषांना जबर मारहाण होऊनही बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल न करता मनमानी कारभार करून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. माजी आमदाराच्या दबावातून हे कृत्य झाल्याचा आरोप करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आला आहे.

यावेळी करिश्मा काळे समवेत पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सुभाष शिंदे, नरसिंग भोसले, फुलचंद काळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोळगाव येथील कायमची रहिवासी असून करिष्मा काळे, निलेश फुलचंद काळे व अभय फुलचंद काळे आम्ही पिंपळगाव पिसा ते एरंडोली रोड रस्त्यालगत जगताप मळा रस्त्याच्या कडेला कावळीच्या झाडाला मोहोळ मध काढण्यासाठी गेलो असता अरुण जगताप बाळू जगताप यांनी आम्हाला कुठलीही विचारपूस न करता बेदम मारहाण केली. जेसीबीच्या साह्याने खड्ड्यात पुरून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर आम्ही बेलवंडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्याकरिता गेलो असता ठाणे अंमलदार यांनी फिर्याद घेण्यास नकार देऊन आम्हालाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित आरोपी हे श्रीगोंदा तालुका येथील माजी आमदार जगताप यांचे चुलत भाऊ असल्याच्या कारणाने त्यांनी पोलिस स्टेशनला फोन करून फिर्याद घेण्याकरिता दबाव आणला. त्यानंतर आम्ही बराच वेळ पोलीस स्टेशनचे बाहेर बसल्यानंतर आमचे मानसिक समाधान म्हणून ‘एनसी’ कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला. वास्तविक मला स्वतः मारहाण केली व आम्ही आदिवासी समाजातील पारधी जातीच्या असून जातीच्या आधारावर बेदम मारहाण करून आमच्या मनाविरुद्ध फिर्याद न घेतली तेव्हा अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार महिलेस मारहाण व छेडछाड केल्याप्रकरणी हे जबाब घेऊन तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.