मोबाईलवर बोलताना पेट्रोल पंपावर लागली आग

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मोबाईलवर बोलू नका अशा सुचनांचे फलक लावलेले असतात. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पेट्रोल भरताना मोबाईलवर बोलताना दुर्घटना घडतात. असाच प्रकार आज (मंगळवार) नागपूरमध्ये घडला आहे. वाहनचालक मोबाईलवर बोलत असताना मोबाईलच्या रेडिएशनमुळे आगीचा भडका उडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन वाहने आणि वेडिंग मशीन जळून खाक झाली. ही घटना नागपूर शहरातील टेलिफोन एक्सचेंज चौकातील इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर घडली.

पेट्रोल पंपावर इंधनाची दररोज तपासणी केली जाते. पेट्रोल पंपावरील कर्मचारी पेट्रोल तपासणीसाठी पेट्रोल भांड्यात काढत असताना एक वाहन चालक मोबाईलवर संभाषण करीत होता. मोबाईलच्या रेडिएशनमुळे पेट्रोलचा भडका उडाला. यामध्ये हरीश बोकडे याची होंडा आणि घनश्याम चांदेकर याची प्लेझर अशा दोन गाड्यांना आग लागली. तसेच वेडिंग मशीला ही आग लागली. या आगीत दोन्ही गाड्या आणि वेडिंग मशीन जळू खाक झाल्या.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी पाण्याचा फवारा मारून आग विझवली. ही आग नेमकी मोबाईलवरील संभाषणामुळे लागली की अन्य कारणामुळे याचा शोध घेतला जात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.